Monthly Archives: August 2013

७५ * तू लपलास गुणांत

 बागेतील तारका –

७५ * तू लपलास गुणांत

कुठे शोधू तुला,   ध्यास लागला मनी

वाटे मजला,    तू बसलास लपुनी

इंद्र धनुष्याचे रंग,    आकर्षक वाटती

बघण्यात दंग,    लक्ष वेधुनी घेती

ओढ्याची झुळझुळ,    पडे कानावरी

ऐकून नाद मंजुळ,    मना वेडे करी

फुलातील गंध,    तल्लीन करी मना

होऊनी मी धुंद,    विसरे सर्वाना

फळातील रस,    देई मधुर स्वाद

उल्हासी मनाला,    देऊनी आनंद

वाऱ्याची झुळूक,    रोमांचकारी

देई देहा सुख,    अल्हाद्कारी

रंग, गंध, रस, स्पर्शात,    तुझ्या अस्तित्वाची जाण

तू लपलास गुणांत,    तुला शोधणे कठीण

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७०८५०

e-mail –  bknagapurkar@gmail.com

७५ नाजूक वेली

७५  नाजूक वेली

नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   //धृ//

हिरवी साडी अंगावरी      खडी रंगीत किनारी

ठिपके चमकती पांढरे       त्या साडीवरती पसरे

आकर्षक साडी नेसली   //१//

नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली

शरीर तुझे बांकदार      रुप तुझे मनोहर

चपळाईने तूं वाढते       दूर जाण्या झेपावते

वाकड्या चालीत शोभली  //२//

नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली

मिष्किलपणें तूं हासते      विनम्रतेने वाकून जाते

पसरवूनी तुझा सुगंध       करी सर्वाना तूं धुंद

राणी ठरतेस बागेमधली  //३//

नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली

बघूनी नभीचे तारे   भेटण्या  तुझे मन हावरे

परि खंत वाटे तुजला     आधार हवा चढण्याला

नको उंचावू इच्छा आपुली  //४//

नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

७४ वेड लावतोस तूं कुणां कुणां !

बागेतील तारका-

७४  वेड लावतोस तूं कुणां कुणां !

हे मुरलीधर मनमोहना

वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//

तुझ्या भोवती नाचती गौळणी

भान त्यातर गेल्या हरपूनी

थकूनी गेल्या नाच नाचुनी

विसरुनी गेल्या घरदारानां //१//

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना

रमले सारे गोकूळवासी

पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी

बागडती सारें तव सहवासी

करमत नाही तुजविण त्यांना //२//

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना

संसार सोडला राधेने

भारुनी गेली तव प्रेमानें

ध्यास घेतला तुझाच तिनें

तुजविण नव्हती दूजी भावना //३//

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहना

मीरेचे तर प्रेम निराळे

विषालाही प्राशन केले

तुजसाठी सर्वस्व अर्पिले

कसा तारशी तुं भक्तांना //४//

वेड लावतोस तूं कुणां कुणां ?

हे मुरलीधर मनमोहन

डॉ. भगवान नागापूरकर

                                                                  ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

७३ धन्य ती महाराष्ट्र माऊली !

बागेतील तारका-

धन्य ती महाराष्ट्र माऊली !

धन्य ती महाराष्ट्र माऊली

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली     //धृ//

ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी

ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी

तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली    //१//

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा

हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा

अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली     //२//

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

संवाद करुन विठोबाशी, नामदेव नाचला

तल्लीन होऊनी भजनासी, मधूर गाऊ लागला

भक्ति अर्पून प्रभूला, भावी निरंजने ओवाळली     //३//

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

तसेच झाले एकनाथ, भागवत त्यानी लिहीले

श्री रामदास स्वामी, दासबोध रचिले

निवृती सोपान मुक्ताबाई , कित्येक झाली संत मंडळी    //४//

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

शिवरायाची बातच न्यारी, दुमदुमला प्रताप

अंबेडकरांनी न्याय देऊनी, दलितास दिले योग्य माप

प्रतिकार करुनी जुलमाचा, अन्यायाला वाचा फोडली     //५//

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

टिळक आगरकर साने गुरुजी, तसेच झाले फुले

सावरकर सेनापती बापट, ह्यानी शुरत्व दाखविले

सारय़ांनी महान होऊनी, देशाची मान उंचाविली     //६//

अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com