Monthly Archives: January 2017

ज्ञानेश्वराची चेतना

ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।
दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।।
सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।
हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।।
आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।
बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।।
निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।
जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।।
संचार त्यांच्या आत्म्याच्या , सदैव होत राही ।
ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

सदैव नामस्मरण

सदैव नामस्मरण

प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा ।
ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा ।।
चमत्कार दिसून आला एके दिवशी ।
राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी ।।
विज्ञानाने उकल केली या घटनेची ।
खात्री करिता सत्यता पटली याची ।।
चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे ।
त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे ।।
शब्दांचे वलय फिरती देहाभोवती ।
शरीरासाठी तेच शब्द कवच बनती ।।
जेव्हां होते नामस्मरण प्रभूंचे सतत ।
शब्द ध्वनी लहरी निघत असे अविरत ।।
हुंकार तसाची ऐकू येई देहां जवळी ।
निद्रेमध्ये जरी असला मेंदू त्या वेळी ।।
सदैव नामस्मरण चेतना देत राहतो ।
रामतिर्थांच्या अनुभवांनी हेच अनुभवतो ।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

संकोचलेले मन

संकोचलेले मन

मध्य रात्र झाली होती, सारे होते शांत ।
रस्त्यावरती तुरळक व्यक्ती, वाटला एकांत ।।
एक गाडी मंदिरीं थांबली, त्याच शांत वेळीं ।
सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी ।।
सारे होते नशिबात त्याच्या, धन संपत्तीचे सुख ।
दिवस घालवी मग्न राहूनी, कार्ये पुढती अनेक ।।
तर्कज्ञान तीव्र असूनी, आगळा बाह्य चेहरा ।
परि अंर्तमन सांगत होते, सत्यास शोध जरा ।।
केव्हां केव्हां विजय होई, सुप्त त्या विचारांचा ।
संकोचल्या मनीं गाभारा बघे , रात्री मंदिराचा ।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

कळसूत्री बाहुल्या

कळसूत्री बाहुल्या

नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे ।
टकमक पाहात हांसत होत्या, चोहीकडे ।।
झीम्मा खेळे, फुगडी खेळे, गरगर फिरती ।
हातवारे करुन त्या, माना डोलावती ।।
जवळ येवून गुजगोष्टी, सांगे एकमेकींना ।
सासू नणंद यांच्या, कुलंगड्या काढतांना ।।
सुख दुःखाच्या कथा, सांगितल्या त्यांनीं ।
कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी ।।
अज्ञानी गरीब बिचाऱ्या, जेंव्हा संकल्प करती ।
कळसूत्री बाहुल्या त्या, दोर इतरां हातीं ।।

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

सिकंदरचे खंतावलेले मन

सिकंदरचे खंतावलेले मन
राजा अँलेक्झॉंडर दी ग्रेट हा ग्रीस देशाचा. ज्याला युनान म्हणत. एक परकीय आक्रमक भारतात आला होता. तो महापराक्रमी, लढवय्या, शुरवीर जसा होता, तसाच सहिष्णू, प्रेमळ व अध्यात्मिक प्रवृतीच होता. ह्याचमुळे त्याला भारतातच सिकंदर ( ज्येता व नशीबवान )ही लोकपदवी मिळाली होती. तो त्याच्या घोडेस्वार सैनिकासह होता. रस्त्यात लागणारे प्रदेश पादाक्रांत करीत, लुटालुट करीत, तो पुढे पुढे चालला होता. रस्त्यांत भेटणारे गांवकरी भितीने पळून रानावनांत धावत होते. जे कोणी समोर आले, ते त्याला अभिवादन करुन नतमस्तक होत. ह्याचमुळे अहंकाराच खतपाणी त्याला मिळत होत. त्याची घोडदौड चालू होती.
अचानक त्याची नजर एका फकीरावर (साधूवर ) पडली. तो एका झाडाखाली दगडावर बसला होता. दोघांची नजरा नजर झाली. फकीराच्या चेहऱ्यावर एक अविचल, शांत, निर्भय, भाव होता. इतके सैन्य बघून देखील त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता वा भिती दिसून आली नाही. सिकंदरने आपला घोडा त्याच्या पुढ्यांत नेऊन थांबवला. सारे घोडेस्वार थांबले. सिकंदर घोड्यावरुन उतरला. फकीरासमोर गेला. दोघानी एकमेकाना बघीतले. सिकंदर फकीरास आपला परिचय देऊ लागला.
” मी अँलेक्झॉंडर अर्थात सिकंदर युनानहून भारतात आलो आहे. ”
फकीर उठून शांतपणे त्याच्याकडे टक लाऊन बघत होता. थोड्या वेळाने फकीराने चौफेर नजर टाकली. सर्व सेनिकांचे अवलोकन केले. तो सिकंदरकडे वळून विचारु लागला.
” राजा तू येथे कशासाठी आलांस ? ”
सिकंदर छद्मीपणाने हसला. ” मी सम्राट आहे. येथील प्रदेश जिंकून घेणार. संपत्ती लूटणार .” फकीराने हलके व शांतपणे विचारले ” त्या नंतर पुढे काय करणार ? ”
सिकंदर उत्तरला ” पुढे काय ? हे लुटलेले धन युनानला घेऊन जाणार ”
” त्यानंतर काय करणार ? ” फकीराने थोडेसे कुत्सीकतेने विचारले.
” काय करणार त्यानंतर ? कांहीही नाही. शांतपणे जगण्याचा प्रयत्न करीत, उर्वरीत सार आयुष्य व्यतीत करणार ” सिकंदर मोठ्या गर्वाने उत्तरला.
फकीर हसला. तो सिकंदरकडे एक नजर लाऊन बघू लागला. ” राजा हे सारे करुन, इतका उपद्वाप करुन, शेवटी शांततेच्याच मार्गाचा विचार करणार आहेस ना ? मला हसू येत ते याच की तू हे सार झाल्यानंतर, जे करु इच्छीतोस, ते तर मी आजच करीत आहे. – – – –
एका शांततेचा शोध. अनुभव जाणीव ,ज्यात फक्त असेल समाधान, प्रेम आणि नितांत आनंद. ”
राजा गंभीर होऊन सारे ऐकत होता. ” राजा तुझ्या बाबतीत एक सत्य परीणाम मला
दूरदृष्टीने दिसतो. तुझ्या शांततेच्या अंतीम प्रयोगांत, एक जाणीव तुला सदैव बेचैनी करील. तुझ्या मनाची होणारी तगमग, उत्सुकता, आशा-निराशेचे झोके, केलेल्या शक्तीप्रयोगाचा पश्चाताप, दुखावलेल्या आत्म्यांचा अक्रोश, आणि तुझा बनलेला अहंकार. हे सारे भावनिक अविष्कार, तुझ्या मनाला त्या शांततेच्या जवळच येऊ देणार नाहीत. आनंदापासून वंच्छीत करतील ”
राजाचे डोळे पाणावले होते. कसल्याश्या अनामिक आंतरीक शक्तीने त्याच्या सद्सदविवेक बुद्धीवर फुंकार घातल्याची त्याला जाण आली. जवळची कांही फळे फकीरापूढे ठेवीत, त्याने फकीरास अभिवादन केले. खंतावलेल्या मनाने तो पुढे निघून गेला.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com