Monthly Archives: December 2017

दर्शनाची ओढ

दर्शनाची ओढ

पांडूरंगाचे दर्शन घेण्या, गेला पंढरपूरी ।
चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी ।।

आजपरी शरीर दुबळे साथ देईना ।
मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना ।।

आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी ।
भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी ।।

आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे ।
अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते ।।

चार दिवस पडून होता विठ्ठल विठ्ठल गजरी ।
फिरणे नाही मागे अशी मनीची तयारी ।।

गेला नाही कण अन्नाचा चार दिवस पोटी ।
ध्यास लागला मनी एकची त्याच्याच भेटीसाठी ।।

टाळ मृदुंग विठ्ठल नामी एक रूप झाला ।
नाचत नाचत प्रभू चरणी येऊन तो पडला ।।

विलीन झाला अनंतात तो फिरूनी नाही उठला ।
देह सोडूनी पांडूरंगी चरणी वैकूंठी गेला ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

मशाल

मशाल

श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर ।
विविध नामे परि, दुर्बलांची करण्या कामे ।१।
अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी ।
दैवी शक्ती अंगी, अंधारी चमकली ठिणगी ।२।
मशाल घेवून हाती, आला धावत पुढती ।
अति वेगाने, सर्वांची उजळीत मने ।३।
कर्म योग आणि भक्ती, ह्या तीन ईश्वरी शक्ती ।
एकत्र जाहल्या, मशालीत त्या समावल्या ।४।
वाहत्या काळाच्या ओघात, ते शरीर झाले शांत ।
जग सोडूनी, परि मशालीत शक्त ठेऊनी ।५।
ही तीच मशाल घेवूनी, पुढती चाले दूजा कुणी ।
वारसा त्यांचा, प्रेषित ज्या शक्ती ।६।
जरी तो नाही जगी आता, तत्त्व कार्य ते मागे उरता ।
मशाल रूपे, जन म्हणूनीच जपे तिजला ।७।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

आज-उद्या

आज-उद्या

‘उद्या’ साठी जगतो आम्हीं राहून मृत्युच्या दाढी ।
भविष्यांतील सुख कल्पूनी आज सारे कष्ट काढी ।।

‘आज’ राहतो नजिक सदैव ‘उद्या’ चालतो पुढे पुढे ।
आज नि उद्या यांची संगत कधीही एकत्र न पडे ।।

कष्ट ‘आज’ चे शिरीं वाहूनी ध्येय ‘उद्या’ चे बघती ।
हातीं न कांही पडते तेव्हां निराश सारे होती ।।

समाधान चित्तीं आणण्या प्रयत्न सारे ‘आज’ व्हावे ।
‘आज क्षणाला’ अस्तित्व असतां भविष्याला सोडून द्यावे ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

चाकोरी

चाकोरी

नव्हतो आम्ही आमचे कधींही बनले जीवन दुजामुळे ।
कर्तेपणाचा भाव तरीही येतो कां मनी ? ते न कळे ।।

कसा आलो या जगतीं ठाऊक नव्हते कांही मजला ।
कसा वाढलो हलके हलके जाण आहे याची मला ।।

जेंव्हा झालो मोठा कुणीतरी वाटू लागले कांही करावे ।
काळाने परि दिले दाखवूनी जीवन प्रवाही वाहात जावे ।।

परिस्थितीच्या काठामधूनी जीवन सरिता वाहात जाते ।
वाहात असता त्याच दिशेनें इच्छीत ध्येय हातीं नसते ।।

होते सारे अखेर तेचि आखून ठेवते नियती जे जे ।
अज्ञानानें समजत राही हे केले मी, अन् हे माझे ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

तूच माझा ईश्वर

तूच माझा ईश्वर

मनांत ठसले रूप तुझे, येते नयना पुढे ।
रात्रंदिन मज चैन ना पडे…..।।धृ।।
शरीर जरी सुंदर मिळे ।
प्रयत्नांनी तूंच कमविले ।।
चपलता ही छाप पाडीते ।
लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे
मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ।१।
हासणे खेळणें आणि चालणें ।
‘ढंगदार’ तुझे बोलणे ।।
शरीरामधल्या हालचालींना ।
सहजपणाचे वळण पडे
मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे….।२।
स्वभाव आहे जरी मृदू तो ।
प्रसंग पडतां कठीण भासतो ।।
सज्जना पुढती नम्र दिसूनी ।
दुर्जना शिरीं वज्र पडे
मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ….।३।
हृदयीं माझ्या घर करूनी ।
तव प्रतिमा दिली ठेवूनी ।।
ईश्वर तूंच खरा तो ।
पूजन सदैव करीते
मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ….।४।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com