Monthly Archives: November 2015

उदरांतील शेषशायी

उदरांतील शेषशायी

 

मातेच्या उदरांत झोपला, शेषशायी भगवान

वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन

 

शेषशायीचे चित्र बघतां, साम्य ते दिसेल

उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल

 

शेषापरी वेटोळे असुनी, ‘ नाळ ‘ तयाला म्हणती

क्षारयुक्त पाण्यामध्यें, बालक ते निद्रिस्त असती

 

बालकाच्या नाभी मधुनी, येई कमलाकृती भाग

जीवनसत्व त्यावर असुनी, ब्रह्मापरी दिसे अंग

 

‘ सो हं ‘ निनादुनी सांगे, ‘ मीच तोच ईश्वर आहे ‘

चुकीचा समज करुनी, तयास सागरीं पाहे

 

विवीधतेनें सुचवी, ‘ अहं ब्रह्मास्मि ‘ सत्य ते

कां आम्ही धांवत असतो, त्यास शोधण्या बाह्यांते

 

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

 

आई

आई

 

कशासवे तुलना करुं गे आई, तव प्रेमाची

कां शब्द न सुचतां म्हणू तुजला,   ‘ प्रेमची ‘

वात्सल्याची देवता, करुणा दिसे नसानसातूनी

हात फिरवीता ज्याचे वरती, ह्रदय येते उचंबळूनी

जेव्हां पडते संकट, आठवण करितो आपली आई

विश्वासाचे दोन शब्द, उभारी त्यासी देई

नऊ मास असता उदरीं, शक्ति तेज आणि सत्व देई ते

ह्याच ईश्वरी गुण बिजानी, वाढ तयाची होऊन जाते

रक्ताचे नाते असतां, प्रेम बंधन दिसे ते

काटा रुजतां तुमच्या पायी, डोळ्यांत तिच्या पाणी येते

धन दौलत ही असता हाती, मिळेल तुम्हां सारे कांही

आई तुमची एक बिचारी, पर्याय तिजला जगांत नाहीं

 

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

कविता स्फूर्ति

कविता स्फूर्ति

 

पूर्णपणें मज पटले आतां

कविता कुणी करवून घेतो

कोण असेल तो माहित नाहीं

मजकडून तो लिहून घेतो

 

घ्यानी मनीं कांहींही नसतां

विषय एकदम समोर येतो

भाव तयांचे जागृत होऊन

शब्द फुले ती गुंफून जातो

 

एका शब्दानंतर दुसरे

आणि तिसरे, लगेच चौथे

शब्दांची ती भरुनी ओंजळ

माझ्या पदरीं कुणी टाकतो

गुंफण करुनी हार बनता

त्याजकडे मी बघत असे

फक्त प्रभूचे नाम घेऊनी

अर्पण त्याला करीत असे

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

बहिरा ऐके कीर्तन

बहिरा ऐके कीर्तन

गम्मत वाटली प्रथम मजला       बहिरा ऐके कीर्तन

अश्रू वाहू लागले माझे नयनी      भाव त्याचे जाणून

नियमित येई प्रभूचे मंदिरी         श्रवण करी कीर्तन

केवळ बघुनि वातावरण ते          तल्लीनच होई मन

सतत टिपत होते मन त्याचे        इतर मनांचे भाव

केवळ जाणण्या भगवंताला           डोळे आतुर सदैव

रोम रोमातून शिरत होत्या           प्रभू निनाद लहरी

संदेश प्रभूचा पोह्चूनी                  आत्म्यास जागृत करी

होऊन गेला प्रभूमय बहिरा            धुंद त्या वातावरणी

ऐकत होता तो शब्द प्रभूचे           श्रवण दोष असुनी

 

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

विरोघांत मुक्ति

विरोघांत मुक्ति

भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती ।

परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती ।।१।।

लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा ।

जानकीस पळवून नेई, विरोध करण्यास प्रभुचा ।।२।।

झाली इसतां आकाशवाणी, कंसास सांगून मृत्यु त्याचा ।

तुटून पडता देवकीवरी, नाश करण्या त्याच प्रभुचा ।।३।।

प्रभी अवताराचे ज्ञान होते, परि विरोध करीत राही ।

होऊन गेले तेच प्रभूमय, सतत त्याचाच ध्यास घेई ।।

रोम रोम तो शोधत होता, कोठे लपला आहे ईश्वर ।

भक्ति असो वा विरोध असो, तन्मयताच करी साकार ।।

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com