Monthly Archives: June 2017

साक्षीदार

साक्षीदार

‘घटना’ जेव्हां घडली अघटित ।
कुणीही नव्हते शेजारी ।।
कां उगाच रुख रुख वाटते ।
दडपण येवूनी उरीं ।।

जाणून बुजून दुर्लक्ष केले ।
नैतिकतेच्या कल्पनेला ।।
एकटाच आहे समजूनी ।
स्वार्थी भाव मनी आला ।।

नीच कृत्य जे घडले हातून ।
कुणीतरी बघत होता ।।
सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे ।
हेच सारे सुचवित होता ।।

कोण असावा हा गुप्त साक्षीदार ।
नितिमत्ता शिकवी त्याला ।।
बाह्य जगातील द्रष्टा असूनी ।
अंतर्यामीही बसलेला ।।

त्या साक्षीदाराची जाणीव होता ।
कचरुनी जाते मन सदा ।।
अपप्रवृत्तींना आळा बसूनी ।
सत् कर्मे घडती अनेकदा ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

आत्मविश्वास

आत्मविश्वास

आत्मविश्वास जागृत ठेवूनी,
कार्य घेवूनी तडीस नेती ।
कधीही न राही अवलंबूनी,
मदतीसाठी दूजा वरती ।।

ईश्वर करीतो मदत तयांना,
मदत करी जे आपले आपण ।
आपल्यातची तो ईश्वर आहे,
असते याची जयास जाण ।।

विश्वासाने हुरूप येई,
जागृत करीती अंतर चेतना ।
लक्ष्य सारे केंद्रीत होता,
यश चमकते प्रयत्नांना ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

वचन

वचन

वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते ।
मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।।
दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते ।
प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।।
स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी ।
राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।।
प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला ।
पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला ।।
आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते ।
बदलूनी जाती क्षणात सारे, घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।
मित्र वा आप्त कुणी, आई-बाप वा भाऊ-बहीण ।
स्वार्थीभाव अंगी मुरूनी, पाळीत नाही आपले वचन ।।
अंतर्यामी बसला ईश्वर, जाण त्याची सदैव असावी ।
‘वचन’रूपे व्यक्त होई , हीच भावना मनी ठसावी ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

ईश अस्तित्वाची ओढ

ईश अस्तित्वाची ओढ

उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला ।
चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला ।।
किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा ।
गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा ।।
सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी ।
पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी ।।
पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची ।
शक्तीमान ते रूप समजूनी विस्मृती होई स्वत:ची ।।
निसर्ग, देह वा वस्तू असो, अस्तित्व ईश्वरी जेथे ।
उचंबळती प्रेम भावना एकरूप होण्या त्याते ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com